Ad will apear here
Next
नवं पुस्तक : नारायण धारप - एका गूढ, अद्भुत, चित्तथरारक जगाची सफर


भीती, गूढता, अतार्किक जग, मनोव्यापार आदी गोष्टींचा समावेश असलेलं साहित्यातलं एक नवं दालन नारायण धारप यांनी वाचकांसाठी खुलं करून दिलं आणि त्यात वाचकांना गुंतवलं. हे अनाकलनीय वाटणारं जग दाखवताना त्यांनी अंधश्रद्धेला थारा दिला नाही आणि विज्ञानाची कास सोडली नाही. आपल्या वाचकाला प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायला लावली. अशा या लोकप्रिय लेखकाबद्दल प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांनी लिहिलेलं ‘नारायण धारप - एका गूढ, अद्भुत, चित्तथरारक जगाची सफर’ हे
 नवं पुस्तक बुकगंगा पब्लिकेशन्सद्वारे लवकरच प्रसिद्ध होत आहे. त्यांचं आयुष्य, त्यांची प्रेरणा, त्यांच्या निवडक लेखनाचा आस्वाद, त्यांच्या विज्ञानकथा आणि भयकथा यांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन, त्यांचे वाचक काय म्हणतात, असं सगळं काही या पुस्तकात वाचायला मिळेल. घसघशीत सवलतीत या पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू आहे. हे पुस्तक का लिहावंसं वाटलं, याबद्दल लेखिका दीपा देशमुख यांनी लिहिलेलं हे मनोगत... 
..........
नारायण धारप आणि त्यांच्या निवडक लिखाणाचा आस्वाद याविषयी मी लिहिलेलं ‘नारायण धारप - एका गूढ, अद्भुत, चित्तथरारक जगाची सफर’ हे पुस्तक लवकरच बुकगंगा पब्लिकेशन्सद्वारे प्रकाशित होत आहे आणि या गोष्टीचा मला खूप आनंद होतोय. नारायण धारप यांच्यावर का लिहावंसं वाटलं, याची कारणं माझ्या भूतकाळात आहेत. माझ्याप्रमाणेच अनेकांनी वयाच्या त्या टप्प्यावर नारायण धारपांची पुस्तकं वाचली असणार आणि त्या भयाचा, गूढत्वाचा, अतींद्रिय शक्तींच्या जगातून सफरही केलेली असणार.

ही गोष्ट आहे माझ्या शाळेच्या दिवसांतली, त्या किशोरवयीन अवस्थेतली. एके दिवशी अचानक नारायण धारप या लेखकाचं ‘पारंब्याचे जग’ हे पुस्तक माझ्या हातात पडलं आणि त्या पुस्तकानं बघता बघता माझा ताबा घेतला. त्यात वनस्पतींचं जमिनीखालचं मुळांच्या जाळ्यांनी विणलेलं एक गूढ अस्तित्व दाखवलं होतं. दिवस असो वा रात्र, त्यांच्या कथानकातल्या त्या गूढ-रम्य वातावरणानं मला किती तरी वेळ भारून टाकलं होतं. जणू काही त्या गूढत्वाचा मीही एक हिस्सा बनले होते. पुस्तक वाचताना अंधारून आलं, जेवणासाठी आईच्या हाका मारणं सुरू झालं; पण तरीही माझी तंद्री भंग पावली नाही. तहान-भूक विसरून मी वाचतच राहिले. पुस्तक हातावेगळं केल्यावरही सगळे प्रसंग आणि ते वातावरण आजूबाजूला तसंच रेंगाळत होतं. त्यानंतर जिथे मिळेल तिथून नारायण धारप या लेखकाची पुस्तकं मिळवायची आणि वाचून त्यांचा फडशा पाडायचा, असं सत्र सुरू झालं. मला आठवतं, कित्येकदा आई ओरडेल म्हणून रात्री जेवण झाल्यावर झोपायच्या वेळेस मी नारायण धारप यांचं पुस्तक हातात घेई. सगळे गाढ झोपेत असतानाही माझं पुस्तकवाचन सुरूच असे. मग त्या पुस्तकातलं आणि माझ्या आसपासचं शांत वातावरण जणू काही एकरूपच होई आणि मग पुस्तकात लेखकानं उभं केलेलं गूढ आणि भयावह वातावरण माझ्या आसपास कधी निर्माण होई याचा मला पत्ताच लागत नसे. त्या वातावरणाची मला खूपच भीती वाटे. कथानकातल्या गूढ अमानवी शक्ती कुठल्याही क्षणी आपल्यावर झडप घालतील असंही मनात येई. अशा वेळी देवघरात असलेल्या रेणुकादेवीच्या सहा फूट उंचीच्या मोठ्या फोटोकडे पाहत मी मनातल्या मनात देवीची प्रार्थना करीत असे आणि उसना आधारही मागत असे; (त्या वेळी मी धार्मिक आणि आस्तिक होते.) पण त्या भीतीपोटी पुस्तक बाजूला ठेवून देऊ आणि उद्या वाचू असं कधीही होत नसे. पुस्तक बाजूला ठेवण्याऐवजी पुढचं पान वाचायला सुरुवात करत असे. 

मला आठवतं, परीक्षेच्या आदल्या दिवशीदेखील मी नारायण धारपांचं पुस्तक पूर्ण करूनच अभ्यासाचं पुस्तक हाती घेतलेलं होतं. अगदी लहान वयातल्या परिकथांनी कल्पनेची भरारी घ्यायला शिकवलं, तर साहसकथांनी आपणही निर्भीड आणि साहसी व्हायला हवं असं सांगितलं. विज्ञानकथांनी जगण्याचा दृष्टिकोन बहाल केला, तर चरित्रात्मक लिखाणानं माणसाला जाणून घेणं कळत गेलं. एकूणच जगणं समृद्घ करण्यासाठी हे सगळे प्रकार किती प्रकारे आपलं जगणं अर्थपूर्ण करतात हे समजलं. रहस्य, गूढ, भीती या प्रकारातल्या कथांनी तर अंगावर रोमांच उठले आणि जाणिवेच्या पलीकडलं जग बघण्यासाठी मन उत्सुक झालं. इंग्रजीतल्या लेखकांआधी नारायण धारप यांनीच आपलं स्थान माझ्या मनात पक्कं केलं होतं.

मराठी साहित्यात भय, गूढ आणि विज्ञान कथालेखक म्हणून नाव घ्यायचं झाल्यास केवळ नारायण धारप हेच नाव समोर येतं. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर व्रत घ्यावं तसं याच प्रकारात लेखन केलं. साठीच्या दशकानंतर आपल्या कथांचं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या नारायण धारप यांचा वाटा किती महत्त्वाचा होता, हे आज लक्षात येतं. मानवाच्या अस्तित्वासाठी प्रत्येक भावना - प्रेम, माया, लोभ, राग, द्वेष, मद, मत्सर आणि भय यांची नितांत आवश्यतकता आहे आणि या भयाचा परिचय होताना नारायण धारप आपले पाय असे घट्ट रोवून उभे होते, की ‘या सम हाच’ असं त्या वयात आणि त्यानंतरही वाटत गेलं. त्यांच्या पुस्तकांमधून पडके वाडे, गढ्या, विवरं, ओसाड माळरानं, विचित्र अंधार, झाडांची सळसळ, वातावरणातला गूढपणा आणि अशा या वातावरणात असलेलं अघोरी शक्तीचं अस्तित्व, अतार्किक असे प्रसंग, अंगावर काटा यावा असे रक्त गोठून टाकणारे प्रभावी आविष्कार अनुभवायला मिळाले.

प्रमिला नारायण धारप यांच्याशी संवाद साधताना लेखिका दीपा देशमुख

दिवस सरकत राहिले आणि पुढल्या प्रवासात एके दिवशी आपण नारायण धारप यांच्यावर लिहावं, असं वाटलं. मग शोध सुरू झाला. नारायण धारप यांच्या पत्नी प्रमिला धारप यांची २०१४ साली भेट घेऊन गप्पा मारल्या होत्या आणि नारायण धारप यांच्याविषयी अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या होत्या. तसंच त्यांच्या मुलाला, डॉ. शिरीष धारप यांना भेटले. दोघांनीही मला अनेक संदर्भ लेख आणि फोटोज दिले. मग वाट आणखीनच सोपी होत गेली. या पुस्तकाच्या निर्मितीत अजिंक्य विश्वाससह अनेकांचं साह्य लाभलं आहे. पुस्तक प्रकाशित झालं, की परत एकदा भेटून सांगेनच.

नारायण धारप यांच्यावर पुस्तक लिहिताना नारायण धारप कसे होते, त्यांचा स्वभाव कसा होता, त्यांची लिखाणाची शैली कशी होती, त्यांच्या लिखाणावर कोणाकोणाचा प्रभाव होता अशा अनेक गोष्टी उलगडत गेल्या. त्यांच्या निवडक लिखाणाचा आस्वाद घेता आला. पुन्हा ते भूतकाळातले क्षण जगता आले. नारायण धारप हे माझे आवडते लेखक असल्यानं त्यांनी जे भरभरून दिलं, त्याचं ऋण कधीही चुकतं करता येणार नाही; पण कृतज्ञतेपोटी त्यांची आठवण पुस्तकरूपात जागवता येणार आहे हाच आनंद शब्दातीत आहे.



बुकगंगा पब्लिकेशन्सद्वारे हे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. पुस्तकाची नोंदणी सवलतीच्या दरात सुरू आहे. नोंदणीची लिंक खाली दिली आहे. नोंदणी अवश्य करा, अशी विनंती मी करते.

- दीपा देशमुख, पुणे
ई-मेल : adipaa@gmail.com

(पुस्तकाची सवलतीत नोंदणी करण्यासाठी https://www.bookganga.com/R/88Z7S या लिंकवर क्लिक करा.)




 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KXEWCQ
Similar Posts
कवितांची एक सुंदर संध्याकाळ उत्तम सादरीकरण करणाऱ्या कवीच्या आवाजात मंचावरून त्याच्या कविता ऐकणं हे नेहमीच आनंददायी वाटतं मला. त्यातून तो कवी गायक असेल आणि त्याच्या जोडीला तितकीच सुंदर कविता वाचणारी आणि गाणारी मंडळी असतील तर मग विचारायलाच नको. अशीच एक सुंदर संध्याकाळ आज (२३ जानेवारी २०२०) अनुभवायला मिळाली मिलिंद जोशींच्या ‘असंच होतं ना तुलाही
आकाशफुले...! जीए नावाचं गूढ थोडंसं उकलताना...! एखादा दिवस आयुष्याला असा काही धक्का देऊन जातो, की त्याची सुखद जाणीव प्रत्येक पावलासोबत जवळ राहते. तो दिवसही मनात वेगळा कप्पा तयार करून स्वतःहूनच त्यामध्ये जाऊन बसतो. अधूनमधून बाहेर डोकावतो, आणि नव्या दिवसावरही तो जुना, सुखद अनुभव गुलाबपाण्यासारखा शिंपडून जातो... अगदी अलीकडचा तो एक दिवस असाच, मनाच्या कप्प्यात जाऊन बसला
सदानंद रेगे मराठी कवितेचा आनंदरसास्वाद घेताना कवी सदानंद रेगे हे नाव राहून गेलं तर तसा फार मोठा फरक पडेल असं नाही. खुद्द रेगेंनाही तसा पडला नाही.
हरित द्वीपाचा राजा नुकत्याच होऊन गेलेल्या बालदिनी सकाळी सकाळी पं. नेहरूंची अनेक भाषणं वाचली. लिखाणाची महत्त्वाची कामं आटोपली आणि मग ‘मनोविकास’निर्मित ‘हरित द्वीपाचा राजा’ हे सुनील गंगोपाध्याय या प्रख्यात बंगाली लेखकाचं पुस्तक वाचायला घेतलं.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language